मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आवाडेंची मनधरणी? पाऊण तासाच्या बैठकीनंतरही आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम | CM Shinde Kolhapur Breaking News
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतरही आवाडे लोकसभा लढविण्यावर ठाम, तब्बल पाऊण तासाच्या बैठकीनंतरही आवाडेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश!
कोल्हापूर | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील सुत्रे गतीमान झाली आहेत. कालच ताराराणी पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. या चर्चेत हातकणंगले मतदारसंघात आवाडे गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजकिय तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यभरात हातकणंगले तालुका उमेदवारीच्या कारणास्तव गेले काही दिवस जास्त चर्चेत आहे. मुख्यत: राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या पारंपारिक विरोधकांच्या लढतीमुळे संपुर्ण जिल्ह्यातील लोकांचे याठिकाणी लक्ष लागलेले होते, अशातच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी शड्डू ठोकल्याने ही लढत रंगतदार झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी केलेल्या दौऱ्यानंतर राजकिय चक्रे एका रात्रीत अधिकच गतीमान झाली. आणि दुसऱ्याच दिवशी इचलकरंजी विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रस्थापित उमेदवारांना आव्हान देत आपली उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत आहेत. याचं पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हातकणंगले मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी राजकिय जोडणी करण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्री आणि आवाडे यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.
हातकणंगले मतदारसंघात माने आणि आवाडे गट एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या मतदार संघात विद्यमान खासदार माने यांना महायुती कडून तिकिट मिळालं आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला आवाडे गटाने खासदार बदला अशी मागणी करत विरोध केला होता. त्याचबरोबर राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसाठी देखील प्रयत्न केले होते. मात्र दरम्यानच्या घडामोडीत प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी करून थेट धैर्यशील माने यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
आवाडेंच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाडे गटाची मनधरणी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतली असल्याचं राजकिय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र तब्बल पाऊण तासाच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही आवाडे लोकसभा लढविण्यावर ठाम असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे आवाडेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना अपयश आल्याचे बोलले जात आहे.