Kolhapur News | खरीपाच्या तोंडावर नवीन विकत घेतलेली बैलजोडी तलावात बुडाली, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Kolhapur News | खरीप हंगामाच्या तोंडावर मनपाडळे (ता. हातकणंगले) गावात मंगळवारी (दि. १०) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या बैलाला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. ही घटना जाखले (ता. पन्हाळा) येथील शेतकरी सुरज पाटील यांच्या बैलजोडी बाबतीत घडली.
सकाळी अकराच्या सुमारास सुरज पाटील हे मनपाडळे गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या शेतात मशागत करून बैलांना पाणी पाजण्यासाठी शेजारच्या तलावाकडे गेले होते. तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलजोडी गाडीसह थेट पाण्यात गेली आणि बुडू लागली.
घटनेनंतर सुरज पाटील, त्यांचे वडील पंडित पाटील आणि सचिन गोसावी यांनी तातडीने बैलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरातील शेतकरीही घटनास्थळी धावून आले. मोठ्या प्रयत्नांनंतर एका बैलाला वाचवण्यात यश आले. मात्र दुसऱ्या बैलाच्या गळ्याभोवती चामडीची चापटी आवळली गेल्याने तो पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला.
ही माहिती मिळताच तलाठी सतीश नेवरेकर, पोलिस पाटील माणिक पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आरती दांडगे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या घटनेत एकूण अंदाजे १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, शेतकरी सुरज पाटील यांनी खरीप हंगामासाठी केवळ एक दिवस आधीच, म्हणजेच सोमवारी (दि. ९) कोलोली येथून तब्बल ३ लाख रुपयांना नवी बैलजोडी खरेदी केली होती. दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारची दुर्घटना ओढवल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.