थोडं डॉक्टरांकडे जाऊन येतो.. असं सांगत घरातून निघाला.. दुसर्या दिवशी शववाहिकेतून घरी मृतदेहच आला, कोल्हापूरातील दुर्दैवी घटना | Kolhapur News

Kolhapur News | “ताप कमी होत नाहीये… थोडं डॉक्टरांकडे जाऊन येतो!” – असं सांगून सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलवरून घरातून निघालेला प्रथमेश घाटगे (वय २२) दुसऱ्या दिवशी शववाहिकेतून परत आला. जाधव पार्क परिसरातील ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी समोर आली आणि एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूमुळे घाटगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रथमेशला ७ जून रोजी ताप आला होता. त्याने लगेचच डॉ. विजय कुलकर्णी यांच्याकडे तपासणी केली. डेंग्यूच्या IGM आणि IGG चाचण्या करण्यात आल्या होत्या, मात्र दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याच्यावर ओपीडीवर उपचार सुरू ठेवण्यात आले. पण ९ जून रोजी त्याची प्रकृती अधिकच बिघडली. सलाईन लावण्यासाठी तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला, मात्र तिथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यामुळे त्याला तातडीने डॉ. सागर पाटील यांच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले मात्र, सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि १० जूनच्या पहाटे दोनच्या सुमारास प्रथमेशने अखेरचा श्वास घेतला.
पहाटे मृत्यू झाल्यानंतर सकाळी प्रथमेशचा मृतदेह घरी आणण्यात आला. जेव्हा शववाहिका घरासमोर येऊन थांबली, तेव्हा आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचा हंबरडा ऐकून परिसरातील लोकांच्या डोळ्यांत देखील अश्रू आले. एकलुत्या एका मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्युने घाटगे कुटूंबिय पुरते हादरून गेले आहे.
या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ हालचाली करत जाधव पार्क परिसरातील १०० घरांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये ३१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ७ जणांना ताप असल्याचे आढळले. एका तरूणाच्या मृत्युनंतर प्रशासन सतर्क झाले असून हेच काम पावसाळ्याच्या सुरूवातीलाच का करण्यात आले नाही असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
कोल्हापूर महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत सातत्याने हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि अन्य साथीचे आजार डोके वर काढू लागतात. त्यामुळे पाणी साचू नये, डासांच्या उत्पत्तीला आळा बसावा यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज आहे, असं आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केलं आहे.