Kolhapur Robbery | कसबा सांगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून १५ तोळ्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
Theft Shocks Kasba Sangav: Gold, Silver & Cash Stolen from Locked House
कागल | कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात चोरी (Kolhapur Robbery) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाकी वसाहतीमधील एका बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, ९०० ग्रॅम चांदी व रोख ५० हजार रुपये असा लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घरातील लोक आपल्या मूळ गावी राधानगरी तालुक्यातील वाकी येथे गेले होते. यावेळी चोरीचा प्रकार घडला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे विद्युत पुरवठा बंद होता. याचा फायदा घेत अज्ञातांनी घराचे कुलूप तोडून चोरी केली.
बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजता कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी तत्काळ कागल पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना देखील बोलावण्यात आले.
कागल पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक वैभव जमादार, तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरीचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
या घटनेमुळे वाकी वसाहतीत आणि कसबा सांगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी आणि पावसात वीजपुरवठा बंद असल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेतल्याचे दिसून येत आहे. पोलिस अधिक तपास करत असून लवकरच चोरट्यांचा छडा लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


