
कोल्हापूर | खरीप हंगामपूर्व हुमणी कीड नियंत्रणासाठी (Humani Control) कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने मंडळस्तरावरील नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि उपाययोजनांची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ नुकताच बेले गावातील शेतात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंधर पांगरे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “हुमणी कीड ही ऊस पिकावरील प्रमुख समस्या असून, खरीप हंगामात तिचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता एक जनजागृती मोहीम ठरावी, यासाठी सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.”
ही स्पर्धा ७ जून २०२५ पर्यंत सुरु राहणार असून, सहभागी शेतकऱ्यांनी स्वतःहून कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करणे अपेक्षित आहे. सापळ्यांमधून पकडलेले हुमणी भुंगे कृषी विभागाकडे जमा करायचे आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ जून असून, शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी बॅटरी स्प्रे पंप, द्वितीय क्रमांकासाठी हँड स्प्रे पंप, तृतीय क्रमांकासाठी चार्जेबल टॉर्च तर उत्तेजनार्थ ‘पाडेगाव पहार’ हे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा कसा लावावा? How to install a light trap for humani control?
हुमणीचा प्रादुर्भाव वळीव पावसानंतर अधिक प्रमाणात दिसतो. भुंगे अंडी घालण्याआधीच त्यांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोटारपंपजवळ ५ x ४ फूट आकाराचा व १ फूट खोल खड्डा तयार करून त्यात पाणी व कीटकनाशक भरावे. या खड्ड्यावर १०० वॅटचा बल्ब बसवून संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत ते कार्यान्वित ठेवावे. प्रकाशाकडे आकर्षित झालेले भुंगे पाण्यात पडून मरतात आणि प्रादुर्भाव टाळता येतो.
कामगंध सापळ्यांचे वितरण अनुदानावर
कामगंध सापळा व ल्युर हे साहित्य कृषी विभागाकडून अनुदानावर पुरवले जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना २०२५ अंतर्गत बेले (ता. करवीर) येथील शेतकरी चंद्रकांत भिकाजी पाटील यांना ट्रॅक्टरसाठी १.२५ लाखांचे अनुदान मंजुरी पत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
