परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची आवाहन, अर्ज करण्याची मुदत वाढवली | Foreign Scholarship Scheme
कोल्हापूर | महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी (Foreign Scholarship Scheme) अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 6 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेतून QS रँकिंगमध्ये समाविष्ट असलेल्या टॉप 200 परदेशी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा योजनेची जाहिरात 25 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती व अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे होती. मात्र विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही मुदत 6 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती योजनेच्या प्रमुख अटी व अर्हता:
- अर्जदार इमाव (OBC), विजाभज (VJNT), विमाप्र (SBC) प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
- कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- वयोमर्यादा – पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, तर पीएच.डी. साठी 40 वर्षे.
- विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील उत्पन्न सादर करणे आवश्यक.
- विशेष परिस्थितीत (विधवा, घटस्फोटित, विभक्त) महिलांनी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक.
- 30% जागा महिलांसाठी राखीव आहेत.
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळू शकते.
- शिष्यवृत्ती एकदाच मंजूर होईल – एकाहून अधिक वेळा मिळणार नाही.
- पदवी/पदव्युत्तर परीक्षेत किमान 55% गुण आवश्यक.
- परदेशातील संस्था ही QS World Ranking 2025 मध्ये टॉप 200 मध्ये असावी.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया:
विद्यार्थ्यांनी अर्जाचा नमुना www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज दोन प्रतींमध्ये 06 जून 2025 रोजी किंवा त्यापूर्वी समक्ष किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावा:
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय,
आकार प्रिमायसेस, दुसरा मजला,
एम.एच.बी. कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स,
समता नगर, येरवडा, पुणे – 411006
योजना लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


