Madha Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचं अखेर ठरलं? अकलूजमध्ये हालचालींना वेग!
सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha Election 2024) तिढा गेल्या कित्येक दिवसांपासून कायम होता. या सगळ्यात मोहिते पाटलांच्या घरामध्ये बंडाच्या चर्चा सुरू होत्या. धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेला शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार’ या पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
धैर्यशील पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार? Madha Lok Sabha Election 2024
गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मध्यंतरी अमावस्या असल्यामुळे धैर्यशील पाटील यांनी निर्णयाची घोषणा केली नाही, असे सांगितले जात होते. मात्र, ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार गटात जाणार का, अशी चर्चा होती. मात्र, हा मुहूर्त संपत आला तरी धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही.
गेल्या आठवड्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली,याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या सव्वा तासाच्या बैठकीत धैर्यशील पाटील यांनी काही अडचणीचे मुद्दे शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते. या सगळ्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करु शकतात.


