Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून शशिकांत शिंदे; राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. यामध्ये साताऱ्यातून (Satara Lok Sabha Election 2024) उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नव्हता. श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचे कारण देत पुन्हा निवडणुक लढण्यास नकार दिल्याने दरम्यानच्या काळात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देखील उमेदवार म्हणून समोर आले होते. परंतु आता याठिकाणच्या जागेचा तिढा सुटला असून महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे अशी चुरशीची लढत होणार आहे.

आमदार शशिकांत शिंदे येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या आमदार शशिकांत शिंदे यांचे मुंबईहुन आगमन होणार असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

महाविकास आघाडीने कालच पत्रकार परिषदेत जागावाटपाचं सूत्र जाहीर केलं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे. आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यात आता सातारा आणि रावेर या दोन जागांची भर पडली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आता त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे देखील सुरु केले आहेत. त्यामुळे आता उदयनराजे विरूध्द शशिकांत शिंदे अशी चुरशीची लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे. 

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा