डॉ. तात्याराव लहाने यांचे ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर आज कोल्हापूरात व्याख्यान | Dr Tatyarao Lahane

कोल्हापूर | डोळ्यांसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या अवयवाच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ‘डॉक्टर्स डे’ निमित्त कोल्हापूरात एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. “डोळे आणि आरोग्य” या विषयावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane) चे मार्गदर्शन या व्याख्यान लाभणार आहे. मंगळवार, दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे हे व्याख्यान आ होणार आहे. गेली 21 वर्षे ही आरोग्य व्याख्यानमाला अविरत सुरू असून, यंदाचे हे 22वे वर्ष आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि दै. ‘पुढारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांच्या सन्मानार्थ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत आतापर्यंत जागतिक दर्जाचे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले असून, कोल्हापूरकरांनी नेहमीच या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आधुनिक जीवनशैली, सतत मोबाईल-संगणक-टीव्हीचा वापर, असंतुलित आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे डोळ्यांशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर उपाय काय असावेत, कोणते उपचार प्रभावी आहेत, कोणत्या चुका टाळाव्यात, डोळ्यांचे सौंदर्य कसे जपावे यावर डॉ. लहाने मार्गदर्शन करणार आहेत. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा डोळ्यांवर होणारा परिणामही ते स्पष्ट करतील.
डॉ. तात्याराव लहाने हे लातूर जिल्ह्यातील माकेगावचे सुपुत्र असून, त्यांनी ग्रामीण भागात राहून लाखो मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजवर त्यांनी दोन लाखांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून, यासाठी त्यांना जागतिक विक्रम प्राप्त झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे त्यांनी डीन पदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. तात्या लहाने – अंगार, पॉवर इज विदीन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला असून तो रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आईने त्यांना किडनीदान करून जीवनदान दिले आहे – ही एक प्रेरणादायी कहाणी आहे.
या व्याख्यानासाठी प्रवेश फक्त अग्रक्रमानुसार दिला जाणार आहे. पहिल्या तीन रांगा राखीव असून, इतर उपस्थितांनी लवकर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी नागरिकांनी या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.