Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

प्रकाश आवाडेंची उमेदवारी भाजपच्या पाठिंब्याने? शिंदे गटाला मोठा धक्का, धैर्यशील मानेंच काय होणार? Hatkanangale Loksabha Election 2024

कोल्हापूर | हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangale Loksabha Election 2024) ताराराणी आघाडीच्या वतीने प्रकाश आवाडे मैदानात उतरलेत. पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगितले. आपण केलेली ही बंडखोरी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी प्रयत्न केले होते. पण महायुतीने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून आवाडे काय करणार याची उत्सुकता होती. राहुल आवाडे यांनीच आपल्या वडिलांच्या उमेदवारीची घोषणा करत या सगळ्यावर पडदा टाकला आहे.

Hatkanangale Loksabha Election 2024

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार आवाडे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी मैदानात उतरत आहे. आता एकदाच लढणार आणि जिंकणारही. खासदार कसा काम करू शकतो हे मी दाखवणारच. निवडून आल्यानंतर मोदी यांना आपण पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपण भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती, राहुल लढावा अशी इच्छा होती. त्याला निवडून आणतो अशी ग्वाही मी भाजपला दिली होती. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. आता ताराराणी आघाडीच्या वतीने आपण मैदानात उतरणार आणि निवडून येणार असेही त्यांनी सांगितले. ही उमेदवारी ठरवून आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आवाडेंच्या उमेदवारीमागे भाजपच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आवाडे यांच्या या भूमिकेमुळे हातकणंगले मतदारसंघात आता पंचरंगी लढत होणार आहे. महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, वंचित विकास आघाडीचे डी.सी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि आता ताराराणी आघाडीचे आवाडे मैदानात उतरले आहेत.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. यामुळे महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानेच आवाडे यांना उमेदवार म्हणून भाजपने पुढे आणल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. आवडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. आपली ही बंडखोरी नाही असे ते म्हणत आहेत. त्याचबरोबर भाजपने आपल्याला अर्ज भरण्यास सांगितले नसल्याचेही ते म्हणत आहेत.

असं असलं तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे आवाडे वारंवार बोलून दाखवत आहेत. मी जर उभा राहिलो नाही तर मोदींचे पंतप्रधान पदासाठीचे एक मत कमी होईल असेही ते सांगत आहेत. याचा अर्थ आवाडे यांच्या उमेदवारीला भाजपचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आवाडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देणारी ठरणार आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा