बातम्या

राहुल गांधींनी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त केलेल्या पोस्टवरून वाद; भाजप नेते आक्रमक होताच नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचीही दाखवली चूक! Rahul Gandhi Shivaji Maharaj Tweet

Rahul Gandhi Shivaji Maharaj Tweet: संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांनी महाराजांना अभिवादन केले. सेलिब्रिटी आणि राजकारणी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत असताना, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे.

राहुल गांधी यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये “श्रद्धांजली” हा शब्द वापरला. यावर भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे तसेच आमदार अतुल भातखळकर यांनी या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अतुल भातखळकर यांनी सांगितले की, “राहुल गांधी यांनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र आणि देशवासीयांचा अपमान केला आहे. त्यांनी ही पोस्ट मागे घ्यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.”

सोशल मिडीयावर राहूल गांधीना ट्रोल करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी दाखवला आरसा, नरेंद्र मोदींची पोस्ट शेअर करत दिले उत्तर

राहूल गांधीना सोशल मिडीयावर शिवाजी महाराजांच्या पोस्ट वरून ट्रोल करणाऱ्यांना अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2022 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त केलेली पोस्ट शेअर करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्ट मध्येही त्यांना श्रध्दांजलि वाहिली होती.

वंचित बहुजन आघाडीने देखील राहुल गांधींना एक्स (Twitter) पोस्टद्वारे टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “राहुल गांधीजी, जयंतीनिमित्त श्रद्धांजली नाही, अभिवादन करतात. तुम्ही वापरलेल्या शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. कृपया माफी मागा आणि अभिवादन व श्रद्धांजली यातील फरक समजून घ्या.”

काँग्रेसची सारवासारव

या वादानंतर काँग्रेसने राहुल गांधींच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, “राहुल गांधींना इंग्रजीत “Humble Tribute” म्हणायचे होते, ज्याचा अर्थ श्रद्धांजली असा घेतला जातो. भाजपाने मात्र विनाकारण वाद निर्माण केला आहे.” काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपावर टीका करत म्हटले की, “भाजपाकडून खऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी व्याकरणाच्या चुका काढून राजकारण केले जात आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी यासारख्या गंभीर मुद्द्यांवर भाजपाला बोलायचे नाही, म्हणून ते अशा गोष्टींना हवा देतात.”

राहुल गांधी यांच्या या पोस्टवरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा