कोल्हापूर: पाडळी बुद्रुकचे जवान सागर सारंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पटाणकोट येथे बजावत होते सेवा

कोल्हापूर | करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक गावातील भारतीय सैन्यदलात असणारे जवान सागर पुंडलिक सारंग (वय 40) यांचे शनिवारी (दि. 18 ऑक्टोबर) पठाणकोट येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. सोमवारी (दि. 20) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या पार्थिवावर पाडळी बुद्रुक येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
जवान सागर सारंग 2005 साली अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते पटाणकोट येथे सैन्यदलाच्या इंजिनिअरिंग विभागात नायक पदावर कार्यरत होते. गेल्या आठवड्यापासून ते किरकोळ आजारी होते. शनिवारी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सारंग कुटुंबावर तसेच पाडळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सागर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी गावात आणण्यात आले. त्यावेळी आई-वडील आणि कुटुंबियांचा आक्रोश पाहून परिसरातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. सागर यांचे वडील कुंडलिक सारंग हे पाडळी ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी येथून पाडळी येथे स्थलांतरित झाले होते.
वीस वर्षांच्या सेवाकाळात सागर यांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, रांची, राजुरी अशा विविध सीमावर्ती भागात सेवा बजावली होती. ते पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत पठाणकोट येथे राहत होते. दिवाळीनंतर 15 नोव्हेंबरला वाढदिवसानिमित्त गावी येण्याचा त्यांचा बेत होता, परंतु काळाने अचानक घाला घातल्याने ही दिवाळी कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी शोकमय ठरली.
अंत्यसंस्कारावेळी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बी. एच. पाटील, इंद्रजीत पाटील तसेच आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरणगे-पाडळी परिसरातील हजारो लोकांनी हजेरी लावली.
बुधवार, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पाडळी बुद्रुक येथे श्रद्धांजली कार्यक्रम आणि रक्षा विसर्जन सोहळा होणार आहे. जवान सागर यांच्या निधनामुळे पाडळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.