बातम्या

विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा तिढा वाढला | Sangli Lok Sabha Constituency

सांगली | गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तिढ्यामुळे चर्चेत आला आहे. सांगलीची (Sangli) जागा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली असली तरी यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. याच नाराजीतून आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

महाविकास आघाडीत ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याने नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज 

विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते नागपूरकडे (Nagpur) रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी दाखल केली. उद्या काँग्रेस पक्षाकडून देखील ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी सांगलीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते झाले होते आक्रमक

दरम्यान, काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे याआधी दिसून आले. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी असे पत्र अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने  लिहले होते. तसेच रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले होते. 

भाजपच्या माजी आमदाराने दिला विशाल पाटलांना पाठींबा 

दरम्यान, सांगलीत गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवारी विरोधात रोष वाढत आहे. त्यातच माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker