बंडोबा झाले थंडोबा.. आवाडेंचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्र्यांना यश! Hatkanangle Loksabha 2024
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.
कोल्हापूर | हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Loksabha 2024) मतदारसंघातील आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले.
एकदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार अशी गर्जना दोन दिवसापूर्वी करणारे आवाडे आता महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन त्यांची मनधरणी केली तसेच उमेदवारी मागे घेण्यास लावून प्रचारात सक्रिय होण्यास सांगितले आहे.
बंडोबा झाले थंडोबा
महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात आले. त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी थेट भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवाडे यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. त्यानंतर आवाडे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा मावळली. त्यानंतर आवाडेंना घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले.
धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडेंचा विरोध
हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला होता. आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे ( Rahul Awade ) यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली.
त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, तत्पूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राहुल यांना शांत राहावे लागले. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता. आज प्रकाश आवाडे यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतल्याने आवाडेंचा विरोध मावळल्याचे सांगितले जात आहे.