बातम्या

साताऱ्यात उदयनराजे की घड्याळ? महायुतीच्या उमेदवारीचे अद्याप भिजत घोंगडे.. मुंबईतील बैठकीत तोडग्याची शक्यता! Satara Loksabha Election 2024

महाविकास आघाडीने सातारा लोकसभा मतदार संघातून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनाने ते अर्ज भरणार आहेत.

सातारा | लोकसभा (Satara Loksabha Election 2024) निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरलेत. विविध ठिकाणचे उमेदवार अर्ज देखील भरत आहेत. असे असतानाही काही जागांवर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.

कोणत्याही उमेदवाराला अर्ज भरण्याची तयारी करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या आज होणाऱ्या मुंबईतील बैठकीत साताऱ्याची जागा अजित पवार गट की भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळणार आणि उमेदवार कोण असणार यावर आज शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.

Satara Loksabha Election 2024

अजित पवार गटाने सातारा मतदार संघावरील राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, नरेंद्र पाटील यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. उमेदवारी अजित पवार गट की भाजपला, हे ठरले नसले तरी खासदार उदयनराजे भोसले या जागेसाठी भाजपकडून निवडणूक लढण्यास आग्रही आहेत. त्यासाठी त्यांची मुंबई व दिल्लीवारीही झाली असून त्यांनी आपला प्रचारही सूरू केला आहे.

दिल्लीत चार दिवस ठाण मांडल्यानंतर उदयनराजे साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर उदयनराजेंनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. मतदारसंघातील बहुतांश गावात त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जही नेला आहे; परंतु आजही महायुतीच्या उमेदवारीचे कोडे सुटलेले नसल्याने उमेदवारी अर्ज कोण कोण दाखल करणार हे कार्यकर्त्यांना अजून समजत नाही.

महायुतीमध्ये सातारा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. मात्र उदयनराजेंमुळे तो भाजपला हवा आहे. अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हावर उदयनराजे निवडणूक लढण्यास तयार नाहीत. अजित पवारांशी त्यांच तसही पटत नाही. त्यामुळे काही करून हा मतदार संघ भाजप आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबदल्यात नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला देण्यासाठी भाजप तयार आहे.

नाशिक मतदार संघ भाजप राष्ट्रवादीला देण्यास तयार असले तरी या मतदारसंघातून हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गट नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीकडून अद्याप साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघू शकलेला नाही.

आता उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवस उरलेत. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला नियोजनही करावे लागणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीची आज मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघेल अशी आशा इच्छूक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker