आमदार प्रकाश आवाडेंच्या बंडखोरीमागे कोण? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत | Hatkanangale Lok Sabha Prakash Awade
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी माझी उमेदवारी जाहीर केल्याचे आमदार प्रकाश आवाडे (Hatkanangale Lok Sabha Prakash Awade) यांचे म्हणणे आहे. महायुतीचा घटक पक्ष असून देखील त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात शड्डू ठोकलाय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचंच यावरून दिसून येतय. जरी प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्याविरोधात आपली उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्या बंडखोरी मागे नेमका कोणाचा हात आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत आहे.
पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या (Congress) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन प्रकाश आवाडे (Prakash Awade) बाहेर पडले. त्यांनी अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. 2019 ची विधानसभा जिंकल्यानंतर न मागता त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. त्यातही उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. लोकसभेच्या हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला गेल्या महिन्याभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध सूरू आहे.
आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारी दर्शवत महायुतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वीच माने यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे राहुल आवाडेंचे बंड अवघ्या काही दिवसात थंड झाल्याचे बोलले जात होते. मात्र, अंतर्गत त्यांचा मानेंना असलेला विरोध कायम आहे. नंतरच्या घडामोडीत पत्रकार परिषद घेऊन राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली.
आवाडेंच्या बंडखोरीमागे कोण? Hatkanangale Lok Sabha Prakash Awade
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरत असल्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी (ता. 16) अर्जही भरणार आहेत. आवाडे यांची निवडणूक लढवण्याची ठाम भुमिका पाहता त्यांच्या मागे भाजपचीच ताकद तर नाही ना? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आवाडे यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे. पण स्थानिक पातळीवर गणितांमुळे त्यांना पक्षप्रवेशास अडचणी येत आहेतच. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. त्यातूनच त्यांनी थेट लोकसभेला आव्हान दिले असल्याचे बोलले जाते. आवाडे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास या मतदारसंघातील महायुतीचे राजकीय गणित बिघडणार आहे, त्याचा फटका नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

