कोणाच्याही दबावाने उमेदवार बदलणार नाही, मंडलिक व माने हेच उमेदवार : मुख्यमंत्री | Loksabha Election 2024
कोल्हापूर | कोणाच्याही दबावाने कोल्हापूर अणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) उमेदवार बदलणार नाही अशी भुमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार करा आणि त्यांना निवडून आणा असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
Loksabha Election 2024
नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. मंडलिक व माने यांच्याबद्दल चर्चा आता बंद करा आणि त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केल्यानंतरही आवाडे आपल्या भूमिकेवर कायम असल्याने मुख्यमंत्र्यानीही ठाम भूमिका घेत कोणाच्या दबावाने उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारच्या कोल्हापूर दौर्यात दुपारी चार वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत आपल्या पक्षाचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यासाठी राजकीय जोडण्या लावल्या. नियोजित दौर्यात बदल केल्याने मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्याचे त्यांच्या दौर्यातून स्पष्ट झाले आहे.
भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या ताराराणी पक्षातर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे; मात्र जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. येथून त्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे; मात्र भाजपच्या सहयोगी आमदारानेच बंडाचा झेंडा फडकविण्याचे आव्हान दिल्याने महायुतीच्या ऐक्याला तडा गेला आहे. त्याचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत.
महायुतीतील बंड आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना निवडून आणणे एवढेच नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यामुळे कोण काय करतो, याकडे लक्ष न देता सगळ्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयावर लक्ष केंद्रित करा, अशा शब्दांत नेते व कार्यर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते शंभूराज देसाई, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.


