माने यांचा अर्ज भरताना प्रकाश आवाडे उपस्थित राहणार? मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज | Loksabha Election 2024
कोल्हापूर | महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि इचलकरंजीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी भरला जाणार आहे. काल कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री सायंकाळपासून पहाटे चार पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यामध्ये व्यस्त होते. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. पण उद्या सोमवारी ते पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याने दोन्ही उमेदवारांना निवडणुक जड जात असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे.
Loksabha Election 2024: मुख्यमंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान उद्या नेते व कार्यकर्ते गांधी मैदान येथे जमणार आहेत. तेथून शक्ती प्रदर्शनाने सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पेट्रोल पंप चौक येथे मनोगते होणार आहेत.
मंडलिक आणि माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालक मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक तसेच आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, समरजीतसिंह घाटगे यांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते. तथापि, आज महायुतीच्या पत्रकात आमदार आवाडे हे उद्या उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख केला आहे. आवाडेंनी आपली उमेदवारीची तलवार म्यान केल्यास ते मुख्यमंत्र्यासोबत उपस्थित राहू शकतात. त्यामुळे आवाडे यांचा भूमिकेकडे मतदार संघातील लोकांचं लक्ष लागलं आहे.
आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका देखील गुलदस्त्यात
आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीला आमदार विनय कोरे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. खासदार माने यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतरही यड्रावकर हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे बोलले जात आहे. कोरे सध्या भाजपसोबत आहेत. माने यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यासह इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आहे. पण आवाडे, कोरे आणि यड्रावकर तिघांनीही दोन तास बंद खोलीत चर्चा केल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळेच आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका काय आहे हे अद्याप पूर्णतः स्पष्ट झालेले नाही.


