अजित पवारांना कोल्हापूरात धक्का! प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा | Kolhapur Loksabha Election 2024
कोल्हापूर | कोल्हापूरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवला. देशातील वाढत चाललेली हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. ए.वाय. पाटील यांचा हा निर्णय अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला आहे.
Kolhapur Loksabha Election 2024: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे सहकारी असणारे ए.वाय.पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज होते. भाजपमधील काही नेत्यांनी देखील ए.वाय.पाटील यांना महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय होण्याची विनंती केली होती. मात्र आज त्यांनी आपली नवी राजकीय भूमिका थेट नवीन राजवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार यांच्या उपस्थितीत शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवत जाहीर केली.
यावेळी बोलताना ए वाय पाटील यांनी देशातील संविधान बदलते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याबरोबरच सुरू असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी शाहू महाराजांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून शाहू महाराजांना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणू अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान व्यासपीठावर शाहू महाराजांनी ए.वाय.पाटील यांची गळाभेट घेऊन त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा मफलर घातला . त्यामुळे ए.वाय.पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची भूमिका स्पष्ट केली नसली तरी अप्रत्यक्षरीत्या प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू होती.
ए.वाय.पाटील यांच्या पाठिंबामुळे माझा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाल्याची भावना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली. ए.वाय.पाटील राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना त्यांना त्याठिकाणी योग्य स्थान मिळाले नाही. आता त्यांनी योग्य दिशा घेतली असून भविष्यात राजकीय दृष्ट्या त्याचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही. अन्याया विरोधात लढण्याचे ए.वाय यांनी ठरवले असून भविष्यात त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली.


