Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

‘या’ कारणामुळे 2 दिवस अंबाबाई देवीचे दर्शन राहणार बंद! Kolhapur Ambabai Temple

कोल्हापूर | साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांना दोन दिवस मुकावे लागणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहावी या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीनुसार मूर्ती संवर्धन प्रक्रिया रविवारी (दि. 14) व सोमवारी (दि. 15) राबविण्यात येणार आहे. त्यामुळे गाभारागृह दर्शनासाठी बंद राहणार असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही.

मुर्ती संवर्धन काळात गाभारागृह बंद राहणार असल्याने उत्सवमूर्ती व कलश पितळी उंबर्‍याच्या बाहेर ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी याचे दर्शन घेण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापूरात येत आहेत. परंतु देवीचे दर्शन दोन दिवस बंद राहणार असल्याने भाविकांना या काळात अंबाबाईच्या दर्शनास मुकावे लागणार आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची प्रचंड झीज झाली असून ४ तारखेला झालेल्या सुनावणीत तज्ज्ञांनी पाठवलेल्या अहवालावर चर्चा झाली. यात तज्ज्ञांनी तातडीने मूर्तीचे संवर्धन करून घ्यावे, अशी शिफारस केली होती. त्याची पुढील सुनावणी २३ तारखेला होणार आहे. तसेच मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला कळविले होते. त्यानुसार विभागाच्या तज्ज्ञांनी मूर्तीची पाहणी केली.

मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्याबाबतचा अहवाल विभागाने दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने, देवस्थान समितीने २८ मार्च रोजी महासंचालक भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्ली यांना मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन आज रविवारी व उद्या सोमवारी करण्यात येणार आहे.

अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन अद्ययावत तंत्राद्वारे करण्याची मागणी

अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन उपलब्ध अद्ययावत तंत्राद्वारे योग्य पद्धतीने व्हावे या मागणीचे निवेदन प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पुरातत्त्व विभाग, देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनासह संबंधित विभागांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मूर्तीची झालेली झीज रोखण्यासाठी 2015 व 2021 मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. या संवर्धनावेळी अनेक अनुचित बाबी निदर्शनास आल्या. त्यावेळी काही चुका झाल्याचे अहवालातून समजले. गत संवर्धनासाठी वापरलेले पदार्थ हे मूळ मूर्तीच्या पाषाणाशी न जुळल्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेल्याचे व झीज झाल्याचे अहवालात नमूद आहे. आत्ता करण्यात येणारे संवर्धन हे योग्य पदार्थाचा वापर करून होणे आवश्यक आहे.

मूर्तीचे संवर्धन केवळ दोन दिवसांत होणार आहे ही आश्चर्यकारक बाब आहे. ही प्रक्रिया इतकी साधी आणि सोपी असेल तर ती राबविण्यात इतका विलंब का केला, असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. घाईगडबडीत आणि अयोग्य पद्धतीने पुन्हा संवर्धनाचे काम होऊ नये. तसे घडल्यास संबंधित सर्व अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी निवेदनातून दिला आहे.

दरम्यान, श्री अंबाबाईच्या मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे गंभीर स्थिती होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे, असे असताना पुन्हा पुरातत्वत्त्व विभागाकडून श्री अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. संवर्धन करण्यापूर्वी या संवर्धनामुळे पुन्हा मूर्तीची हानी झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा