खा. संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा कळंब्यात निषेध! Kolhapur Loksabha 2024
कोल्हापूर | कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha 2024) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या बद्दल खासदार मंडलिकांचा सर्व स्तरातून निषेध सुरू आहे. कळंब्यातील अंबाबाई मंदिराजवळ नागरिकांनी एकत्र येत निदर्शनं करून खासदार मंडलिक यांचा निषेध केला.
यावेळी मंडलिक यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुमन गुरव, उपसरपंच वैशाली टिपुगडे, ग्रामपंचायत सदस्य सोनल शिंदे, विकास पोवार – बावडेकर, उदय जाधव, आशा टिपुगडे, माजी उपसरपंच अरुण पाटील टोपकर उपस्थित होते.
खासदार संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात “आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे” असे उद्गार काढले होते. कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यावरील या टीकेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे मंडलिक यांचा सर्व स्तरातून निषेध सुरू झाला होता.


