बातम्या

भाजपची उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता | Satara Loksabha 2024

Summary: उदयनराजेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा निरोप धनंजय मुंडे यांनी दिला होता.

सातारा | सातारा लोकसभा मतदार संघात (Satara Loksabha 2024) महायुतीच्या उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. तरीदेखील खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उमेदवारी अर्ज घेऊन अर्जासोबत भरावी लागणारी अनामत रक्कमही भरली आहे. येत्या गुरुवारी (ता. 18) ते उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतर्फे भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा होणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यंदाच्या लोकसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांच्या नावाच्या अकरा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेशच नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समर्थकांच्या नाराजीची दखल पक्षाने घेतलेली नाही. त्यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. जर भाजपने खरोखरच उदयनराजेंचा पत्ता कट केला तर ते अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरणार का हे पहावं लागणार आहे.

उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदार संघ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला असून उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचारास सुरुवात केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे महायुतीकडून कधी अर्ज दाखल केला जाणार याची उत्सुकता आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा