आनंदाची बातमी: महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस; देशात सरासरी १०६ टक्के पावसाचा अंदाज | IMD Weather Update 2024
Summary: हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस, दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत IMDने केले आहे.
मुंबई | देशात माॅन्सून काळात (जून ते सप्टेंबर) चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD Weather Update 2024) वर्तवला आहे. सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने माॅन्सून हंगाम 2024 चा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज (ता.15) जाहीर केला. या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. सरासरीच्या106 टक्के पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
IMD Weather Update 2024
देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर नैऋत्य भारत, ईशान्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. 1971-2020 या वर्षांदरम्यान देशातील माॅन्सून काळात पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवले आहे. यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपलेला असेल. अल निनो चा प्रभाव कमी होत आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. अखेर हवामान विभागाचा अंदाज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

