साताऱ्यात उदयनराजेंची कॉलर टाईट! भाजपाकडून 12व्या यादीत लोकसभेची उमेदवारी जाहीर | Satara Loksabha Udayanraje
Summary: सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा | भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) लोकसभा उमेदवारांची 12वी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंना (Satara Loksabha Udayanraje) उमेदवारीसाठी तिष्ठत ठेवल्यानंतर अखेर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशी लढत पहायला मिळणार आहे.
उदयनराजे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागल्याने सर्वत्र उदयनराजेंवर टीका देखील सुरू झाली होती. शहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तरीही भाजपने उदयनराजेंचे तिकीट जाहीर केले नव्हते.