साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढणार! पण उदयनराजेंच काय? Satara Loksabha Election 2024
सातारा | महाविकास आघाडीकडून साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण लोकसभा (Satara Loksabha Election 2024) लढणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. साताऱ्यात महाविकास आघाडीची जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार देत माघार घेतली आहे. श्रीनिवास पाटील यांच्या माघारीमुळे पवार गटाकडे उदयनराजे यांच्याविरोधात तगडा उमेदवार नाही. त्यामुळे मला सांगितल्यास मी लढण्यास तयार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली आणि भिवंडी हे दोन मतदारसंघ मिळत नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय चाचपून पाहणार्या काँग्रेसला यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून दिलासा मिळणार आहे. भिवंडीच्या बदल्यात काँग्रेसला सातारा मतदारसंघ सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविल्याचे वृत्त असून सातारा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
सातारा, सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खलबते झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर तपशील सांगण्यास आमदार पाटील यांनी नकार दिला. या बैठकीनंतर सांगलीतून जयंत पाटील, तर सातारा येथून चव्हाण हे लढत असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, सांगलीवरील दावेदारी सोडण्यास काँग्रेस राजी झाली आहे. याठिकाणी ठाकरे गटाने आधीच पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीला कोड्यात टाकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सातार्याच्या रिंगणात उतरविता येईल, असा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे या जागेवर काँग्रेसचे चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव चर्चेत आला आहे. सातार्यात लढण्यास इच्छुक असलो तरी आपण काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली आहे. अखेर राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भाजपकडून मात्र उदयनराजेंच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.


