स्वाभिमान असेल तर दुसऱ्यांच्या पाठिंब्यासाठी पायऱ्या का झिजवतात? खा. धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा एकाच वाक्यात हिशोब केला! Hatkanangale Loksabha Election 2024
कोल्हापूर | शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करत असल्याचा निशाणा माने यांनी साधला आहे. (Hatkanangale Loksabha Election 2024) खाजगी वृत्तवाहिन्या आणि मिडीया प्रतिनिधींशी बोलताना माने यांनी हा घणाघात केला आहे.
यावेळी धैर्यशील माने म्हणाले की, स्वाभिमान असेल तर दुसऱ्यांच्या पाठिंब्यासाठी पायऱ्या का झिजवतात? असे म्हणत माने यांनी राजू शेट्टींच्या एकला चलो रे या भूमिकेवरच बोट ठेवले. राजू शेट्टी फक्त आणि फक्त स्वकेंद्रित राजकारण करत असल्याची टीकाही माने यांनी यावेळी केली.
राजू शेट्टी केवळ स्वतः कसे निवडून येतील हेच पाहतात. ज्या स्वाभिमानी पक्षाचे ते नेतृत्व करतात त्यातील किती नेत्यांना त्यांनी खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य पदासाठी उभे केले असा सवालही माने यांनी शेट्टींना विचारला आहे. त्याचबरोबर नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही, त्यासाठी एका भूमिकेवर ठाम राहावं लागतं, प्रत्येकवेळी वेगवेगळी भुमिका घ्यायची नसते असा टोलाही माने यांनी शेट्टींना लगावला आहे.
यावेळी धैर्यशील माने यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत तयार झालेल्या संभ्रमाबाबतही स्पष्टीकरण दिले. संजय शिरसाट यांनी केलेले वक्तव्य हे केवळ एप्रिल फूल म्हणून घ्या असे सांगत माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही शंका नाही, माझी उमेदवारी जाहीर झालेली असून मोदींच्या व्हीजननुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या टिकेला राजू शेट्टी काय उत्तर देतात, ते आता पहावं लागणार आहे.


