धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात? आठ पैकी दोन उमेदवार बदलण्याची शिंदे गटावर नामुष्की? Loksabha Election 2024
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी दोन उमेदवारांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे हे दोन जागांचे उमेदवार बदलणार का ? याची चर्चा सुरु आहे.
Loksabha Election 2024 : शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हातकणंगले येथील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना भाजपा पदाधिकाऱ्यांचा मोठा विरोध आहे, तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे शिंदे गटावर हे दोन्ही उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेवर (Shiv Sena) जाहीर केलेले आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावलीय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण शिवसेनेने घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कालच व्यक्त केली आहे. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल, तर मुख्यमंत्री शिंदे असा उमेदवार कधीही बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार किंवा हिंगोलीचे हेमंत पाटील या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट संकेत शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात येत आहेत.
Loksabha Election 2024
या दोन्ही जांगावर दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदेंवर दबाव वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपकडून ज्या भागांत शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, अशा मतदारसंघांवर उघडपणे सुरवातीपासून दावा सांगितला जात असल्याचे दिसत आहे. यावरुन शिंदेंच्या शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपकडून वारंवार सर्व्हेचे कारण देऊन शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या मतदारसंघावर दावा सांगितला जात असल्याचे शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी जाहीरपणे सांगितले आहे. तसेच, मनसेला महायुतीत सामील केल्यामुळे शिंदेंच्याच वाट्याचा मतदारसंघ मनसेला दिला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
जाहीर झालेल्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की?
शिवसेनेने घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता शिवसेनेच्या गोटातूनच वर्तवली जात आहे. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही असेही शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हिंगोली किंवा हातकणंगले किंवा या दोन्ही जागांवरील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंगोलीतील हेंमत पाटील यांना बदलण्याची मागणी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नांदेडच्या विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होणार आहे. हिंगोलीत शिंदे विरुद्ध ठाकरे सामना आहे. हिंगोलीत उमेदवार देण्याचा अधिकार शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. निवडून येईल असा उमेदवार सुचविण्याचे काम आपण करु शकतो. महायुतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचाच उमेदवार असेल. प्रत्येकाने युतीचा धर्म पाळावा असे फडणवीस म्हणाले आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. तेथे राजू शेट्टी यांना ठाकरे पाठींबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. याठिकाणी सध्याच्या घडीला धैर्यशील माने कितीही छातीठोकपणे ही निवडणुक मीच जिंकणार असल्याचा दावा करीत असले तरी त्यांना महायुतीतूनच विशेषत: भाजपच्या पदाधिकांऱ्यांकडून तसेच सहकारी पक्षांकडून मोठा विरोध होत आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी संजय पाटील यांनी उघडपणे धैर्यशील माने यांना विरोध करत त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हणटले आहे. तर भाजपसोबत असलेल्या ताराराणी आघाडीचे राहूल आवाडे यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांनी धैर्यशील मानेंविरोधात रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मात्रोश्रीवरही धडका मारल्या असून याठिकाणी ठाकरे गटाकडून आवाडेंना रिंगणात उतरवले जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.


