हॅलो कोल्हापूर

हातकणंगले लोकसभेच्या उमेदवारांसाठी इचलकरंजी ठरणार निर्णायक | Hatkanangale Loksabha Election 2024

Hatkanangale Loksabha Election 2024: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची महत्वाची भूमिका आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे भाजप सहयोगी सदस्य आहेत. त्याचबरोबर माजी आमदार सुरेश हाळवणकर हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत. त्यामुळे गेली पंधरा वर्षे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याचे पहायला मिळते.

परिणामी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी (महायुती) सक्षम आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदार संघात असलेली नाराजी पाहून याठिकाणी भारतीय जनता पार्टीने याठिकाणच्या जागेवर दावा करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून आ. प्रकाश आवाडे यांनी देखील आपले पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु यामध्ये त्यांना यश आले नाही.

मिरज येथील जातीय दंगलीनंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलत गेले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सुरेश हाळवणकर हे कमळ चिन्हावर निवडून आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कधी नव्हे ते कमळ फुलले. त्यानंतर त्यांनी सलग दोन वेळा आमदारकी भूषवली. 2019 च्या निवडणुकीत आ. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसशी फारकत घेत स्वतंत्र अपक्ष ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यामध्ये आवाडे यांना यश मिळाले. या सर्व घडामोडीनंतर आवाडेंनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामुळे इचलकरंजी मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद असल्याचे दिसून येते.

इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारंडे, अशोक जांभळे यांच्यासह शिवसेनेचे महादेव गौड, सयाजी चव्हाण यांच्याबरोबर इतर लहान-मोठे गट महाविकास आघाडीसोबत आहेत; परंतु उमेदवार ठरत नसल्याने काय हालचाली कराव्यात, याचा संभ्रम आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम आहे. मी आघाडीत येणार नाही; मात्र महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. पण, अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजू शेट्टींबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एक-दोन दिवसांत याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, आणि याठिकाणी ठाकरे गटाचा उमेदवार द्यायचा की राजू शेट्टींना पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला जाईल.

शेट्टींना ‘वंचित’चा पुन्हा फटका बसणार?

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदार संघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी. सी. पाटील यांची उमेदवारी फायनल करण्यात आली आहे. त्यामुळे जातीय समीकरण समोर ठेवून माजी खा. राजू शेट्टी यांना थांबविण्यासाठी डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात आहे. वंचित बहुजन आघाडी ही भाजपचीच बी टीम म्हणून कार्यरत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मागील लोकसभेला देखील राजू शेट्टी यांच्या पराभवाला वंचितचाच उमेदवार कारणीभूत ठरल्याचे पहायला मिळाले होते.

राहुल आवाडेंचा प्रयत्न फसला

ताराराणी पक्षाचे आ. प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशीही चर्चा जोर धरू लागली होती. ते लवकरच ‘मातोश्री’वर भेट देणार अशा बातम्याही येत होत्या. मात्र अद्याप तरी राहुल आवाडे यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने त्यांचा प्रयत्न फसलाय की ते खरोखरच उमेदवारी जाहीर करतात याकडे मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागलं आहे.

Back to top button