कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मतदारांची शिवसेनेला साथ की काँग्रेसला हात? | Kolhapur Loksabha Election 2024
Kolhapur Loksabha Election 2024: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहरी मतदार निवडणुकीत कुणाची बाजू घेणार, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु 2022 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर करीत आहे. आ. सतेज पाटील काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. तर उत्तर मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसच्या आ. जयश्री जाधव करत आहेत. 2022 मधील पोटनिवडणुकीत भाजपने या मतदार संघात लक्षवेधी मते मिळवली होती. सध्या भाजपची धुरा राज्यसभा खा. धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेला साथ देणार की काँग्रेसला हात देणार, याबाबत उत्सुकता आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आ. सतेज पाटील व खा. महाडिक कट्टर विरोधक
जिल्ह्याच्या राजकारणात माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील व खा. महाडिक हे कट्टर विरोधक आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी या समविचारी पक्षांची आघाडी असूनही आ. पाटील यांनी तत्कालिन राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांच्याविरोधात प्रचाराचे रान उठवले. ‘आमचं ठरलयं’ ही टॅग लाईन वापरून थेट शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले.
राज्यातील सत्ताबदलात जिल्ह्यातील राजकारणाची देखील समीकरणे बदलली, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्याच मंडलिकांच्या विरोधात आमदार पाटील यांनी दंड थोपटले आहेत. तर ज्या मंडलिकांकडून पराभव पत्करावा लागला त्याच मंडलिकांचा प्रचार करण्याची जबाबदारी खा. महाडिक यांच्यावर येऊन पडली आहे. महाडिकांसोबत मंडलिकांच्या विरोधात असणारे मुश्रीफ देखील मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर मुश्रीफांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे भाजपचे समरजित घाटगे यांना मंडलिकांच्या प्रचारासाठी मुश्रीफांसोबत एकाच व्यासपिठावर उभ रहावं लागत आहे.
कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला
मतदारसंघ स्थापन झाल्यापासून अपवाद वगळता या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे तत्कालीन आ. सुरेश साळोखे यांचा 2004 मध्ये पराभव करून मालोजीराजे यांनी काँग्रेसचा निशाण रोवले; परंतु 2009 मध्ये पुन्हा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांना पराभूत करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला. 2014 मध्येही क्षिरसागर यांनी विजयाची परंपरा कायम राखली. मात्र 2019 मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. परंतु आ. चंद्रकात जाधव यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विजयासाठी क्षीरसागरांनीही प्रयत्न केले. या पोटनिवडणुकीत भाजपने पहिल्यांदा आपला उमेदवार उभा करून 78 हजार इतकी निर्णायक मते मिळविली होती.
सध्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शाहू महाराज यांच्यासाठी आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरले आहेत. तर खा. संजय मंडलिक यांच्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक हे नेते मैदानात उतरले आहेत.
शाहू महाराज कोल्हापूरकरांसाठी आदरस्थानी असल्याने वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोप यावर बंधने आली आहेत. असे असले तरी मतदानाची तारीख जवळ येईल तशी प्रचाराला धार येणार आहे. लोकसभेला कोणीही उमेदवार असला तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने नेहमीच शिवसेनेला बळ दिले आहे. काही प्रमाणात भाजपनेही या मतदारसंघात पाय रोवले आहेत. सध्या हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेला हा मतदार संघ पुन्हा शिवसेनेला बळ देणार की काँग्रेसची साथ राखणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
2014 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून मिळालेली मते
संजय मंडलिक (शिवसेना) 86,396
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) 82,511
2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून मिळालेली मते
संजय मंडलिक (शिवसेना) 1,01,892
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) 74,237


