बातम्याहॅलो कोल्हापूर

माजी आमदार सुजित मिणचेकरांची पुन्हा उडी.. घेतला मोठा निर्णय.. २७ फेब्रुवारीला करणार पक्षप्रवेश | Sujit Minchekar

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत इनकमिंगचा ओघ वाढत असून, कोल्हापुरातील माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar) हे देखील लवकरच शिंदे गटात सहभागी होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Sujit Minchekar यांची आधी ठाकरेंना आता स्वाभिमानीला सोडचिठ्ठी

शिवसेना ठाकरे गटाकडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून मिणचेकर इच्छूक होते. मात्र हा मतदार संघ आघाडीच्या जागावाटपात कॅांग्रेसकडे असल्याने सुजित मिणचेकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. त्यांनी तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्वीसारखी ताकदीने उभी नाही. अनेक निष्ठावान कार्यकर्ते संघटनेपासून दुरावत आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश करणं फायद्याचं ठरेल, अशी माजी आमदार सुजित मिणचेकर यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटात जोरदार इनकमिंग

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अनेक नेते प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मिणचेकर शिंदे सेनेत दाखल होणार असल्याचे दिसत आहे.

मिणचेकरांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसणार आहे. राजू शेट्टी यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मिणचेकर यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय हालचालींना वेग

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली असून, कोल्हापुरात ‘शिवकार्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मिणचेकर आणि खा. धैर्यशील माने यांच्यात भेटीगाठी वाढल्या होत्या. या बैठकीनंतर देखील मिणचेकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणखी मजबूत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर राजकीय कारकिर्द ओहोटीला लागलेल्या मिणचेकरांना देखील यामुळे राजकीय पुनर्वसनाची संधी मिळणार आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker