ट्रॅक्टर ड्रायव्हरला बेदम मारहाण करून संभापुरातून ट्रॅक्टर पळविला, शिरोली पोलिसात गुन्हा दाखल | Crime News
कोल्हापूर | संभापूर (ता. हातकणंगले) येथे शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) रात्री ८ वाजता स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ९ ते १० जणांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरला बेदम मारहाण करून जबरदस्तीने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेबाबत शिरोली पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप अर्जदार सदाशिव आंधळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
घटनेचा तपशील सदाशिव नामदेव आंधळे (वय ३३, रा. मुळगाव जिल्हा बीड, सध्या राहणार नरंदे, ता. हातकणंगले) हे ऊसतोड मजूर असून, आपल्या पत्नी व अन्य कामगारांसह नरंदे साखर कारखाना परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ऊस तोडून राजाराम सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी जात असताना संभापूर गावच्या हद्दीत स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ९ ते १० जणांनी ट्रॅक्टर (क्रमांक MH 44 Z 4482) अडवून ड्रायव्हर अतुल राठोड याला बेदम मारहाण केली. यात तो अर्धा तास बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी ऊसाने भरलेली ट्रॉली तिथेच सोडून ट्रॅक्टर घेऊन फरार झाले.
पोलिसांचा दुर्लक्षाचा आरोप ड्रायव्हर शुद्धीवर आल्यानंतर त्याने मालकाच्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. मालकाने ट्रॅक्टरचा शोध घेतला, परंतु सापडला नाही. यानंतर शिरोली पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. आठ दिवस पोलिस ठाण्याच्या चकरा मारूनही गुन्हा दाखल केला गेला नाही.
संशयितांवर संशय, तरीही पोलिस चौकशी नाही सदाशिव आंधळे यांनी बीड जिल्ह्यातील तिघा व्यक्तींशी ट्रॅक्टरचा व्यवहार केला होता, परंतु ठरलेले हप्ते न भरल्याने व्यवहार पूर्ण झाला नव्हता. याच तिघांनी ट्रॅक्टर लंपास केल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी न केल्याचा आरोप अर्जात केला आहे.
“ट्रॅक्टर ट्रॉलीवर आमचा उदरनिर्वाह चालतो. जर चोरट्यांनी ट्रॅक्टर विकला किंवा नष्ट केला तर आमच्या कुटुंबाची भीक मागण्याची वेळ येईल. त्यामुळे पोलिसांनी त्वरित तपास करून ट्रॅक्टर परत मिळवून द्यावा,” अशी विनंती आंधळे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


