उदगाव येथे जुन्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून, दोन आरोपी अटकेत | Kolhapur Crime News
Kolhapur Crime News | उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर खोत पेट्रोल पंपाजवळील हॉटेल समृद्धीसमोर जुन्या वादातून विपुल प्रमोद चौगुले (वय २०, रा. जैन बस्ती, उदगाव) याचा चाकूने १३ वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास घडली.
या प्रकरणी संशयित आरोपी अनिकेत मोरे आणि नागेश जाधव (दोघे रा. बेघर वसाहत) यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली असून, त्यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. या घटनेने उदगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी कर्मचाऱ्यांसह पाहणी करून पंचनामा केला. खून झाल्यानंतर चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर जयसिंगपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे.


