विशाळगडावरील अतिक्रमणे 30 दिवसांत काढण्याचे आदेश | Vishalgad
कोल्हापूर | विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्यास न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुरातत्त्व विभागाने 23 अतिक्रमणधारकांना 30 दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाने यांनी याबाबत माहिती दिली. या नोटिसींमुळे गडावर खळबळ उडाली आहे.
गतवर्षी 14 जुलै रोजी झालेल्या विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने प्रशासनाने 175 दिवस संचारबंदी लागू केली होती. सध्या गडावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे.
15 जुलैपासून प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली होती. चार दिवस चाललेल्या मोहिमेत 94 अतिक्रमणे प्रशासनाने हटवली, तर नागरिकांनी स्वतःहून 10 अतिक्रमणे काढली. मात्र काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्याने पावसाळ्यानंतरच कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
विशाळगड व पायथ्याशी अजूनही 158 अतिक्रमणे असून त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. परंतु अद्याप काही बेकायदेशीर बांधकामे काढण्यात आलेली नाहीत. या संदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यानंतर बुधवारी (दि. 5) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर गडावरील सर्व अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. महिनाभरात अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.