मोठी बातमी : विशाळगडावर कोणताही सण-उत्सव साजरा करण्यास बंदी; नव्या एसपींचा आदेश, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष.. Vishalgad

कोल्हापूर | ऐतिहासिक विशाळगडावर (Vishalgad) कोणताही सण अथवा उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली असून, कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. ईदसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे. याआधी उच्च न्यायालयाने विशाळगडवर बकरी ईदच्या कुर्बानीस परवानगी दिली होती, मात्र प्रशासनाने या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मागितली होती.
उच्च न्यायालकडून कुर्बानीस परवानगी
दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थानिकांसह बाहेरील भाविकांनाही कुर्बानीची परवानगी दिली होती. प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत तातडीने सुनावणी आणि स्थगितीची मागणी केली होती. मात्र, न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणीस नकार दिला.
गेल्यावर्षी बंदिस्त आवारात कुर्बानीला परवानगी मिळाली होती. यावर्षी गडावर उरुस १२ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. ही बाब दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर प्रलंबित असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.
पोलिसांचा ठाम निर्णय
विशाळगड हा संरक्षित ऐतिहासिक वारसा असून, येथे कोणताही धर्म वा सण मानणाऱ्या समुदायांनी उत्सव साजरे करणे टाळावे, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे. गेल्या वर्षी १४ जुलै रोजी गडावर दंगल झाल्यानंतर काही काळासाठी पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे यंदाही अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.