“संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा” वाल्मिक कराडने दिला होता संदेश! Walmik Karad
Santosh Deshmukh | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी केज न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. या 1500 पानी आरोपपत्रात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले असून, वाल्मिक कराड (Walmik Karad) हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोपनीय साक्षीदार आणि व्हिडिओ पुरावे महत्त्वाचे
पोलिसांनी पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप ठेवले आहेत. साक्षीदारांच्या मते, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली होती, जिथे वाल्मिक कराडचा “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा” असा संदेश देण्यात आला होता.
तपासादरम्यान सीआयडीला मिळालेल्या एका व्हिडिओत आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जयराम चाटेने व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता, ज्यामुळे पोलिसांनी ही हत्या संघटित टोळीने केल्याचा निष्कर्ष काढला आहे.
सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया
या प्रकरणावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “आरोपपत्रात वाल्मिक कराडचे नाव आल्याने मला आश्चर्य वाटले नाही. बीडमध्ये अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. कोणाच्या पाठिंब्यामुळे आरोपी इतक्या मोठ्या गुन्ह्याला प्रवृत्त झाला?”
त्या पुढे म्हणाल्या, “राज्याची दोन लोकांनी बदनामी केली आहे. परळी आणि बीडचे लोक साधे आणि सरळ आहेत. पण वाल्मिक कराडच्या मागे कोणीतरी मोठे राजकीय व्यक्तिमत्व असल्याशिवाय तो एवढा मोठा गुन्हा करू शकत नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबतही प्रश्नचिन्ह
सुप्रिया सुळे यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबतही प्रश्न उपस्थित केला. “तो राज्यात नसेल, तर परराज्यात आहे का? दिल्लीशी, केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का?” असे सवाल त्यांनी केले.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेतून आरोपींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


