पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेने पीडितेला साडेसात हजार रुपये दिल्याचा दावा, 1 महिनाभरापूर्वीच ओळख | Pune Rape Case
Pune Rape Case | स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे आणि पीडित महिलेची ओळख एका महिन्यापूर्वीच झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये साडेसात हजार रुपयांचा आर्थिक व्यवहारही झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा दावा
आरोपीचे वकील, अॅड. सुमीत पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास पीडिता आरोपीच्या मागे जात असल्याचे स्पष्ट दिसते. आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच, बसमधून पहिल्यांदा दत्ता गाडे उतरतो. त्यानंतर पीडीत तरूणी उतरल्यानंतर त्वरित पोलिसांत जात नाही. उलट, ती आपल्या गावी निघते आणि नंतर हडपसरमध्ये उतरून पुन्हा स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करते.”
साडेसात हजारांचा आर्थिक व्यवहार
आरोपी गाडे याने वकिलांना सांगितल्याप्रमाणे, “मी पीडितेला साडेसात हजार रुपये रोख स्वरूपात दिले. ती ऑनलाईन पैसे घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे हा व्यवहार रोख स्वरूपात करण्यात आला. यावरून आमच्यात वाद झाला आणि त्यानंतर मी तिथून निघून गेलो. कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.”
वकिलांचा दावा
या प्रकरणात आरोपीचे वकील अजिंक्य महाडिक आणि सुमीत पोटे यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडिता यांची ओळख ३१ दिवसांपासून होती. आरोपीने ही माहिती सुनावणीनंतर आम्हाला दिली, त्यामुळे या आर्थिक व्यवहाराचा कोर्ट सुनावणीवेळी उल्लेख केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या नव्या खुलाशांमुळे पुणे बलात्कार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.