कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी; जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ | Gokul Milk

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये सोमवारी पहिलीच महत्वाची याचिका दाखल झाली. ही याचिका थेट गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk) संचालक मंडळ बरखास्तीची व प्रशासक नेमण्याची मागणी करणारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुध संघ असलेल्या गोकुळविरोधात दाखल झालेल्या या याचिकेमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ही याचिका वडकशिवाळे (ता. आजरा) येथील महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केली आहे. त्यांच्या मते, 2020-21 पासून गोकुळमध्ये अनागोंदी कारभार व आर्थिक अनियमितता सुरू असल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून, शासनाने त्यावर आवश्यक ती कारवाई केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Gokul Milk चे विशेष लेखापरीक्षण व निष्कर्ष
गोकुळमध्ये तक्रारी आल्यानंतर शासनाने विशेष लेखापरीक्षणाचे आदेश दिले होते. शासकीय लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांनी 22 मे 2023 रोजी सादर केलेल्या अहवालात गंभीर त्रुटींचा उल्लेख आहे. त्यात निविदा प्रक्रिया न राबविता खरेदी करणे, वाढीव दराने पशुखाद्य खरेदी, मुंबईत करोडो रुपयांच्या जमिनीचे संशयास्पद व्यवहार, जाहिरातींवर वारेमाप खर्च, खासगी व्यक्तींना डोनेशन देणे, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार तीन महिन्यांत गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसान वसूल करणे अपेक्षित होते, परंतु कारवाई झाली नाही.
न्यायालयीन प्रक्रिया
गोकुळवर कारवाई व्हावी यासाठी यापूर्वीही 28 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही सहकार विभाग व दुग्ध विकास आयुक्तालयाने कोणतीही पुढाकार घेतला नाही. अखेर, कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ही याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी 26 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे.
गोकुळ प्रशासनाचा खुलासा
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी संघाने कोणतेही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा केला आहे. “गोकुळने सदैव पारदर्शकतेने व कायद्याच्या चौकटीत राहून कारभार केला आहे. न्यायालयाने सांगितलेले प्रत्येक निर्देश आम्ही पूर्ण केले आहेत,” असे ते म्हणाले.