Kolhapur: लफडेबाज तरूण लॅाजवर रंगेहाथ सापडला; लॅाजच्या दारात कौटुंबिक ड्रामा

कोल्हापूर | कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील हणबरवाडी येथे रविवारी (१ जून) सायंकाळी एका लॉजिंगमध्ये झालेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एका विवाहित तरुणाचे दुसऱ्या महिलेबरोबर असलेले अनैतिक संबंध नातेवाईकांच्या लक्षात येताच लॉजिंगच्या दारात मोठा कौटुंबिक ड्रामा घडला.
सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास वरणगे पाडळी येथील एक युवक अन्य एका महिलेबरोबर लॉजमध्ये थांबलेला होता. दरम्यान, त्याच्या पत्नीचे नातेवाईक तिथेच आले आणि त्यांनी त्या तरुणाला रंगेहाथ पकडले. नातेवाईकांनी लॉजिंगच्या दारातच त्याला जाब विचारताच त्याने संतप्त होऊन शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीची घटना रस्त्यावरच उघड
या सगळ्या घटनेमुळे गारगोटी मार्गावरील प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. संबंधित तरुणाने “तुम्ही माझा पाठलाग करता काय? आता तुम्हाला सोडणार नाही!” असे म्हणत रागाच्या भरात नातेवाईकांवर लाथाबुक्क्यांचा आणि दगडाचा मारा केला. त्याच्यासोबत आलेल्या महिलेने देखील मारहाणीत सहभाग घेतल्याचे सांगण्यात येते.
या झटापटीत तरुणाने लाकडी पट्टीने पत्नीच्या नातेवाईक महिलेच्या डोक्यावर मारून तिला गंभीर जखमी केले. यानंतर नातेवाईकांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि युवक व त्याच्यासोबत असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपी युवकाकडून चौकशी करण्यात येत आहे.
मागील घटनेची आठवण ताजी
या घटनेमुळे आठ ते दहा महिन्यांपूर्वी घडलेली एक घटना पुन्हा ताजी झाली आहे. दिंडनेर्ली ते हणबरवाडी दरम्यान असलेल्या लॉजच्या दारात बिद्री परिसरातील एका प्रेमीयुगुलाला मुलीकडील नातेवाईकांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ धुलाई केली होती. त्या प्रकरणात पोलीस हस्तक्षेप झाला होता, पण शेवटी दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड होऊन प्रकरण मिटवण्यात आले होते.