Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन! Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी, महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही पदयात्रा ऐतिहासिक पन्हाळगडावरून सकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून 9.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी भाषणाने पदयात्रेची सांगता होणार आहे.

शिवजयंती निमित्त आयोजित या पदयात्रेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, खेळाडू आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थी मिळून सुमारे 3000 जण सहभागी होणार आहेत. पदयात्रेदरम्यान पारंपरिक युद्धकलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून आवश्यक सुविधा व मदत केंद्र पदयात्रा मार्गावर ठेवण्यात येणार आहेत.

पदयात्रेला पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथून सुरुवात होणार असून, दुतोंडी बुरुज, शिवतीर्थ उद्यान, बाजीप्रभू देशपांडे पुतळा, तीन दरवाजा, प्रांत कार्यालय, धर्मकोठी मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत मार्ग आखण्यात आला आहे. पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे होईल.

यानंतर सकाळी 9.30 वाजता पदयात्रेत सहभागी मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन होईल. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी भाषणाला सुरुवात होईल. तरी या पदयात्रेस समस्त शिवप्रेमींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यक्रम पुण्यातील शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा