Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

डॉ. संजय डी. पाटील यांचे समाजासाठी मोलाचे योगदान, ‘नोबेल’ विजेते कैलाश सत्यार्थी यांचे गौरवोद्गार; एकसष्टीनिमित्त शानदार समारंभ..! Dr. Sanjay D. Patil

कोल्हापूर | “दुसऱ्याचे दुःख माझे आहे” या करुणेच्या भावनेतून कार्य करणाऱ्या “डॉ. संजय पाटील (Dr. Sanjay D. Patil) यांचा वाढदिवस हा केवळ त्यांचा उत्सव नसून, त्यांच्या रुग्णालयातून बरे झालेल्या लाखो रुग्णांच्या आणि त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव आहे,” असे गौरवोद्गार ‘नोबेल’ पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी काढले. डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव सोहळा डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी डी. पाटील, डॉ. सुमेधा सत्यार्थी, डॉ. संजय डी. पाटील, वैजयंती पाटील, आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Dr. Sanjay D. Patil यांचे शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदान

डॉ. सत्यार्थी यांनी कोल्हापूरच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करत, “कोल्हापूर पूर्वी साखर उद्योगासाठी ओळखले जात होते. मात्र, आता वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातही मोठी प्रगती झाली आहे. या प्रगतीमध्ये डॉ. संजय डी. पाटील आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे मोठे योगदान आहे.” असे मत व्यक्त केले. त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी करुणेचे जागतिकीकरण आवश्यक असल्याचेही सांगितले.

शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा संकल्प

खा. शाहू महाराज यांनी “डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा डॉ. संजय डी. पाटील यांनी यशस्वीपणे पुढे नेला असून, त्यांनी लहानपणापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मोठे काम उभे केले,” असे गौरवोद्गार काढले.

‘नम्रतेने वाग’ हा वडिलांनी दिला मंत्र

अगदी तरुण वयात वडिलांनी विश्वास टाकला, त्यामुळे मी घडत गेलो. दर दोन तीन वर्षांनी नवीन प्रकल्प हाती घ्यायचा माझा संकल्प आहे. दादासाहेबांनी (डॉ. डी.वाय. पाटील) वयाच्या 49 व्या वर्षी 149 विद्यार्थ्यांसह महाविद्यालय सुरु करून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले. आज या ग्रुपचे 182 कॉलेजमध्ये 2 लाख 12 हजार विद्यार्थी शिकत असून 22 हजारहून अधिक स्टाफ कार्यरत आहे. तरुण वयात दादासाहेबांनी मला एक पत्र लिहिले होते. नेहमी नम्रतेने वाग हा त्यांनी या पत्रात दिलेला मंत्र मी आयुष्यभर पाळल्याचे डॉ. संजय डी.पाटील यावेळी म्हणाले.

गौरव ग्रंथांचे प्रकाशन

कार्यक्रमात डॉ. संजय डी. पाटील यांच्या 42 वर्षांच्या कार्यावर आधारित ‘ध्यासपर्व’ आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील नव्या दिशांचे मंथन करणाऱ्या ‘ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथात डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. यशवंत थोरात आणि डॉ. राम ताकवले यांचे लेख समाविष्ट असून, संपादन डॉ. भालबा विभुते यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला शिक्षण, वैद्यकीय, उद्योग, समाजसेवा आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील, डॉ. पी.डी. पाटील , डॉ. डी.टी.शिर्के, डॉ. भालबा विभुते यांची भाषणे झाली.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा