Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

फरार काळात मटका बुकी सम्राट कोराणेकडे 16 लाख कसे आले? पत्नीच्या नावे मालमत्तांची खरेदी.. | Samrat Korane

सम्राट कोराणेच्या केसमधील तपासाधिकार्‍यांचा युक्तिवाद, पत्नीच्या नावे मालमत्तांची खरेदी; 25 पर्यंत पोलिस कोठडीत वाढ.

कोल्हापूर | मोका अंतर्गत कारवाईनंतर सहा वर्षे फरार असलेल्या मटकाबुकी सम्राट कोराणेच्या (Samrat Korane) पोलिस कोठडीत 25 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा आदेश दिला. फरार काळात कोराणेकडे आलेले 16 लाख रुपये कुठून आले आणि त्याने ते कशा प्रकारे खर्च केले, याचा तपास आवश्यक असल्याचे शहर पोलिस अधीक्षक तथा तपासाधिकारी अजित टिके यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

तपासात कोराणे याने ताराबाई पार्क आणि कराड तालुक्यातील साळशिरंभे येथे पत्नीच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तसेच मुंबईतील कुख्यात मटका किंग आणि फरारी संशयित प्रकाश ऊर्फ पप्पू सावला याच्याशी त्याचे आर्थिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमित महाडेश्वर यांनी या अनुषंगाने कोराणेच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

कोराणेच्या आर्थिक व्यवहारांचा शोध

मंगळवारी कोराणेच्या 11 दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला विशेष मोका न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष सरकारी वकील महाडेश्वर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कोराणेच्या फरारी काळात त्याच्याकडे 16 लाखांहून अधिक रक्कम पाठविली गेली. हे पैसे कोणाकडून आले आणि त्यासाठी कोणत्या देवाणघेवाणीचा व्यवहार झाला, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्याने यातील मोठी रक्कम एटीएममधून काढल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, तो मोटारींमधून फिरत होता. त्या मोटारी कोणाच्या होत्या आणि त्याच्याकडे कशा आल्या, याचाही तपास सुरू आहे.

कोराणेच्या शिवाजीपेठ येथील घराची तपासणी केल्यानंतर 23 हजारांच्या जुन्या नोटा आणि 68 हजारांची रोकड सापडली आहे. ही रक्कम कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच फरारी काळात कोराणेला आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अजून अधिक वेळ मागितला आहे.

पोलिस कोठडीसाठी युक्तिवाद

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमित महाडेश्वर यांनी न्यायालयात सांगितले की, कोराणे याचे पप्पू सावला याच्याशी असलेले संबंध उघड करण्यासाठी तपासाची गरज आहे. त्याचा मोबाईल कोण-कोण वापरत होते, यासाठी सीडीआर काढण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पोलिस कोठडी आवश्यक आहे.

मात्र, कोराणेचे वकील अ‍ॅड. एस. वाय. माने यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पोलिसांना न्यायालयात सादर केलेली कारणे आधीच तपासाचा भाग आहेत. 11 दिवसांची पोलिस कोठडी तपासासाठी पुरेशी असून, अधिक कोठडीची गरज नाही. यावर सुनावणी घेत न्यायालयाने कोराणेची पोलिस कोठडी 25 फेब्रुवारीपर्यंत वाढवली.

यावेळी न्यायालय परिसरात कोराणेच्या नातेवाईकांसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker