हॅलो कोल्हापूर

भोगावती बसस्थानकावर दोन कंडक्टरमध्ये सिनेस्टाईल हाणामारी | Kolhapur

कोल्हापूर | करवीर तालुक्यातील भोगावती बसस्थानकावर एस.टी. कंडक्टरमधील वाद सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. ब्रेक निकामी झालेल्या एस.टी.तील प्रवासी दुसऱ्या एस.टी.मध्ये बसवण्यावरून दोन कंडक्टरमध्ये उफाळलेला शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या सिनेस्टाईल हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, करवीर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

शिव्यांपासून हाणामारीपर्यंत

घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी सांगितल्यानुसार, ब्रेक फेल झालेल्या एस.टी.तील प्रवाशांची सोय करण्यावरून अशोक बापू कांबळे (वय 55, रा. चाफोडी, ता. राधानगरी) आणि दत्तात्रय चंद्रकांत गुरव (वय 40, रा. बाचणी, ता. करवीर) यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला आणि भर एस.टी. स्टँडवर दोघांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत हातघाई केली.

परस्परविरोधी तक्रारी

या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात मारहाणीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, एस.टी. प्रशासनाने या घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई केली असल्याचे उघड झालेले नाही.

एस.टी. कर्मचार्‍यांची बेशिस्त उघड

एस.टी. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असली तरी काही कर्मचार्‍यांचा उद्धटपणा आणि अरेरावी प्रवाशांना वारंवार अनुभवायला मिळत आहे. सुट्या पैशांवरून होणारे वाद, गैरवर्तन, आणि अशा प्रकारच्या घटनांमुळे एस.टी.ची प्रतिमा मलीन होत आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker