संतोष देशमुखांच्या आरोपींची कोल्हापुरपर्यंत दहशत; ‘हे’ आहे कनेक्शन | Santosh Deshmukh
कोल्हापूर | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील दहशतीचे अनेक किस्से समोर येत आहेत. याच दरम्यान, एका मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, बीडमधील ऊस तोड मुकादमांनी गेल्या दोन वर्षांत कोल्हापूरकरांची तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केली आहे. त्यामुळं बीडची दहशत केवळ बीड जिल्ह्यापुरतीच सीमित नसून ती कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आता सुरू आहे.
४४५ गुन्ह्यांची नोंद, कोल्हापूर पोलीस ठाण्यांत तक्रारींचा पाऊस
ऊस तोड मुकादमांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात कोल्हापूरमधील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये ४४५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ऊस तोड मजूर पुरवण्यासाठी आधी पैसे घेतले जातात, परंतु प्रत्यक्षात मजूर न पाठवता पैसे हडपण्यात येतात. शिवाय, पैसे मागायला गेलेल्या अनेकांना आणि एजंटांना जीवे मारण्याच्या धमक्या तसेच गंभीर मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कोल्हापूरवर भारी पडली बीडची दहशत
गेल्या काही वर्षांत कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना बीड मधील मुकादमांच्या दहशतीचा अनुभव सातत्याने येत आहे. ऊस हंगामासाठी कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात बीड आणि परळीमधून मजूर येतात. हंगाम सुरू होण्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची मजुरी आगाऊ दिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षात पैसे घेऊन देखील “टोळ्या न पुरवण्याचा” प्रकार समोर आला आहे. मजूर न आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर पैसे परत मागणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मुकादमांचे कनेक्शन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासादरम्यान, बीडमधील मुकादम आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बीडच्या मुकादमांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दाखल गुन्ह्यांना फौजदारी स्वरूप देण्याची मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका
केवळ कोल्हापूरच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची बीडमधील मुकादमांनी फसवणुक केली आहे. मजुरांची टोळी न पुरवण्याच्या फंड्यामुळे अनेकांचे पैसे अडकले असून, काहींवर आत्महत्येची वेळ आली आहे. या प्रकरणामुळे बीडची दहशत पश्चिम महाराष्ट्रातही पसरली आहे.
पोलिसांच्या विशेष मोहिमेची गरज
कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहिमेद्वारे ४४५ गुन्हे दाखल केले. मात्र, हे गुन्हे पुढे फौजदारी स्वरूपात नेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे.


