Kolhapur Cyber Crime: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या नावे फेक अकाउंट तयार करुन तरुणींशी गैरकृत्य; कागल तालुक्यातील एकजण ताब्यात
कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडून गैरकृत्य (Kolhapur Cyber Crime) करणाऱ्या करनूर (ता. कागल) येथील तोहिद शेख (वय २६) या तरुणाला मुरगूड पोलिसांनी अटक केली. या अकाउंटच्या माध्यमातून तरुणाने शीतल फराकटे यांच्या नावाने अनेक तरुणींशी चॅटिंग करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. एका तरुणीच्या सजगतेमुळे या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांना एका तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने तुम्ही दुसऱ्या तरुणाशी मला बोलावयास कसे सांगता असा जाब विचारला. यावेळी फराकटे गोंधळल्या, त्यांनी त्या तरुणीची विचारपूस करून सर्व माहिती समजून घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. इन्स्टाग्रामवरून तुम्हीच मला दुसऱ्या मुलाशी बोलण्यास सांगत आहात, त्याचा फोन नंबर देत आहात हे चुकीचे असल्याची तक्रार तरूणीने केली. त्यानंतर शीतल फराकटे यांना आपल्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून असे कृत्य करण्यात येत असावे अशी शंका आली.
फराकटे यांनी हा प्रकार तपासला असता, त्यांचे नाव वापरून फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघड झाले. फराकटे यांनी आपल्या कुटूंबाच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने संशयित तोहिद शेखचा माग काढून मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तोहीदला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा फोन बंद लागत होता. दरम्यान, त्यानेच एक व्हिडीओ तयार करून आपण शीतल फराकटे यांचे फेक अकाउंट तयार केल्याचे कबूल करून आपण त्यांची माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला.
तोहिदने फेक अकाउंटवरून पाठवलेला मजकूर डिलीट केला असला तरी या अकाउंटचे ७०० हून अधिक फॉलोअर्स होते. त्याने अनेकांना फराकटे यांच्या नावाने संदेश पाठवले होते. पोलिस तपासात अन्य काही मुलींच्या नावानेही फेक अकाउंट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी सखोल तपास करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.