गगनबावड्यातील शासकीय निवासी शाळा ‘रामभरोसे’; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ | Gaganbawda Government Residential School

गगनबावडा | गगनबावडा तालुक्यातील समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शासकीय निवासी शाळेचा (Gaganbawda Government Residential School) कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासन लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वसतिगृह व शाळा उभारते, मात्र प्रत्यक्षात मुलांच्या राहणीमान, आरोग्य व शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गगनबावड्यातील प्रशस्त व देखण्या इमारतीत ही निवासी शाळा सुरू असली तरी व्यवस्थापनातील ढिसाळपणा व गैरजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाकडून अन्नपदार्थ, राहणीमान व अभ्यासासाठी सुविधा पुरविल्या जात असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो. मात्र गृहपाल, मुख्याध्यापक व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळत नाही, उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.
विद्यार्थ्यांना अपुऱ्या व निकृष्ट सोयी – Gaganbawda Government Residential School
वसतिगृहातील मुलांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. सडक्या भाज्या, अळी धरलेले पीठ, याचा वापर करून स्वयंपाक केला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. स्वयंपाकघरातच चप्पल घालून कर्मचारी फिरताना दिसतात.
याशिवाय गृहपाल वारंवार गैरहजर राहणे, कर्मचार्यांचे वैद्यकीय अहवाल वेळेत न करणे, सुरक्षा रक्षकांनी ड्रेसकोडचे पालन न करणे, पत्रकारांनी वास्तव समोर आणू नये म्हणून शाळा प्रशासनाकडून शुटिंगसाठी मज्जाव करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत.
स्थानिकांची नाराजी, कारवाईची मागणी
या सर्व कारभारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्थानिक समाजसेवक, पालक व जबाबदार नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही. उलट व्यवस्थापनाने ढिलाईच दाखवली आहे.
समाजकल्याण विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा पालक व समाजातील जबाबदार व्यक्तींनी दिला आहे.
प्रशासनाला जाग येणार का?
शासन एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षण, राहणीमान आणि आरोग्यासाठी योजना आखून निधी उपलब्ध करून देते. मात्र, त्याच योजनांचा लाभ मुलांपर्यंत न पोहोचता भ्रष्टाचार, मनमानी व निष्काळजीपणाच्या जाळ्यात अडकतोय, हे धक्कादायक आहे.
गगनबावडा शासकीय निवासी शाळेतील वास्तव हे केवळ या शाळेपुरते मर्यादित नसून जिल्ह्यातील इतर निवासी शाळांची स्थितीही अशीच तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.