‘चुकीला माफी नाही’ स्टेटसने कागलमध्ये राजकीय चर्चांना उधाण | Kagal News
कोल्हापूर | कागल तालुक्यात (Kagal News) राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मंत्री हसन मुश्रीफ समर्थकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर दिसणाऱ्या ‘चुकीला माफी नाही’ या संदेशामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ‘समजदारोंको इशारा काफी हैं’ या स्टेटसचा उद्देश कोणत्या गटासाठी आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेल्या या स्टेटसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणते राजकीय समीकरण तयार होणार, याची चर्चा रंगली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुश्रीफ समर्थकांच्या मोबाईलवर ‘चुकीला माफी नाही’ असे स्टेटस पाहायला मिळत आहे. या स्टेटसवर हसन मुश्रीफ आणि गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांचे फोटो लावण्यात आले आहेत. कागल तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर या स्टेटसचा प्रभाव दिसून येत आहे. काही कार्यकर्ते एकमेकांचे स्टेटस पाहून स्वतःचे स्टेटसही बदलत असल्याने हा संदेश झपाट्याने पसरत आहे.
आगामी निवडणुकांवर नजर
आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्टेटसचे महत्त्व वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजय घाटगे यांचा गट उघडपणे मुश्रीफांसोबत होता, तर माजी खासदार संजय मंडलिक यांचा गटही मुश्रीफ गटासोबत होता. दुसरीकडे, समरजित घाटगे यांचा गट एकाकी झुंज देत होता.
आता या स्टेटसचा इशारा मंडलिक गटाला आहे की समरजित घाटगे यांच्या गटाला, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण कोणासोबत आघाडी करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुश्रीफ समर्थकांच्या सोशल मीडिया मोहीमेमुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून या इशाऱ्याचा परिणाम स्थानिक निवडणुकांवर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


