Kolhapur Crime News | आधी जोडीने जोतिबाचं दर्शन घेतलं; नंतर सादळे-मादळे घाटात केला पत्नीचा खून

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या खूनाच्या घटनेने (Kolhapur Crime News) परिसरात खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय शुभांगी सचिन रजपूत हिचा तिच्याच पतीने चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर पतीने थेट सोलापूर गाठून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
सचिन व शुभांगी रजपूत हे पती-पत्नी मागील काही महिन्यांपासून हनुमाननगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी दोघं जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते परतत असताना, सादळे-कासारवाडी घाटात नेऊन सचीनने पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला.
या घटनेनंतर कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करता सचिनने थेट सोलापूरमधील पोलिस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून सादळे घाटात रस्त्यापासून जवळपास ३० मीटर आत शुभांगीचा मृतदेह शोधून काढला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. खून करण्यामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र एका धार्मिक दर्शनाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली पत्नी परतीच्या वाटेवर मृत्यूच्या दाढेत जाईल, हे कोणालाही अपेक्षित नव्हतं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.