Kolhapur Crime News: अवघ्या 16 वर्षाच्या पोरानं केली 16 लाखांची चोरी; ब्रँडेड कपडे, आईस्क्रीम, पिझ्झा यामुळं अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूर | शहरातील एका अवघ्या सोळा वर्षीय मुलाने चक्क १६ लाखांचा ऐवज चोरल्याची घटना (Kolhapur Crime News) समोर आली आहे. या मुलाने चोरीच्या जिवावर चैनीचे जीवन जगायला सुरुवात केल्याने चोरीचा छडा लावण्यासाठी जंग-जंग पछाडणाऱ्या पोलिसाना चोरीचा छडा लावण्यात यश मिळाले आहे.
शनिवार पेठ परिसरातील म्हेत्रे कुटुंबाच्या घरात ही चोरी झाली असून, पोलिसांनी चार दिवसांच्या तपासानंतर अखेर या प्रकरणाचा छडा लावला. नववीत शिकणाऱ्या या मुलाने तब्बल १८ तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड असा सुमारे १५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
म्हेत्रे कुटूंब देवदर्शनासाठी गेलं आणि सोळा वर्षाच्या पोरांना तिजोरी रिकामी केली
शनिवार पेठेतील शुभांगी सुजय म्हेत्रे यांच्या घरी २५ ते ३१ मेदरम्यान चोरी झाली होती. हे कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने घरात घुसून कपाटातील किल्ल्या शोधल्या आणि सोन्याचे दागिने व रोकड चोरली. मध्यवर्ती भागात झालेल्या या घटनेने म्हेत्रे कुटुंबासह पोलिसांनाही धक्का बसला होता.
सुरुवातीला मोलकरणीवर संशय, पण…
पोलिसांनी सुरुवातीला घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर संशय घेतला. तिची कसून चौकशी करून तिच्या घराची झडतीही घेतली, मात्र काहीही सापडले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, पण कुठलाही ठोस पुरावा मिळाला नव्हता. तरी देखील पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सातत्याने तपास सुरू ठेवला होता.
मुलाच्या ‘चैनी’ने उघड केला गुन्हा
दरम्यान, पोलिस निरीक्षक कण्हेरकर यांच्या कानावर आलेल्या बातमीने पोलिसांना तपासाला दिशा मिळाली. म्हेत्रे यांच्या घराजवळच राहणारा एक शाळकरी मुलगा सध्या अत्यंत चैनीचे आयुष्य जगत आहे. महागडे कपडे, ब्रँडेड वस्तू, पिझ्झा, आईस्क्रीम आणि हॉटेलमधील जेवण अशा गोष्टींवर तो पैसे उधळत होता. एवढे पैसे एका शाळकरी मुलाकडे कुठून आले, असा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांचा त्याच्यावरीव संशय बळावला.
सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी तातडीने त्या मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला मुलगा रडत राहिला, काहीच बोलला नाही. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. पण तो सराईत गुन्हेगारासारखा उत्तरं देत राहिला. अखेर पोलिसांनी चार फटके दिल्यावर त्याने चोरीची कबुली दिली.
मुद्देमाल टेरेसवर लपवला होता
चोरी झालेल्या दागिन्यांबद्दल विचारल्यावर त्याने सर्व दागिने त्यांच्या टेरेसवर पत्र्याच्या आडोशाला लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याने उरलेली रोकडही पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
‘किल्ली दिसली, आणि…’
या मुलाचे म्हेत्रे कुटुंबाशी चांगले संबंध होते. त्याचे त्यांच्या घरात नियमित येणे-जाणे होते. त्यामुळे घराची माहिती त्याला होती. एकदा घरात कोणी नसताना तो आत शिरला आणि त्याला कपाटाजवळ किल्ल्या दिसल्या. लॉकर उघडल्यावर आत त्याला दागिने आणि नोटांचे बंडल दिसले. क्षणात त्याने सर्व लंपास केले. आणि घरी जाऊन टेरेसवर दागिने आणि पैसे लपवून ठेवले.