कोल्हापूर महापालिका निवडणूक : २० प्रभागांत ३२७ उमेदवार, ५३ माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात | Kolhapur Municipal Corporation elections

कोल्हापूर | महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे (Kolhapur Municipal Corporation elections) चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, यंदाच्या निवडणुकीत राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी २० प्रभागांतून एकूण ३२७ उमेदवार नगरसेवकपदासाठी नशीब आजमावत आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी ८१ नगरसेवकांची निवड करण्यासाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकूण ५३ माजी नगरसेवक यंदा पुन्हा जनतेची मते मागत असून, यामध्ये दोन माजी महापौर, तीन माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समितीचे माजी सभापती तसेच अनेक अनुभवी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ नवख्या उमेदवारांची नसून अनुभव आणि नव्या चेहऱ्यांची सरमिसळ असलेली ठरणार आहे.
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशा सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग झाले. अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे एकेकाळी एकाच पक्षात असलेले नेते यंदा परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत. यामुळे अनेक प्रभागांमध्ये लढत अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या यादीकडे पाहिले असता काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक २२ माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये एका अपक्ष नगरसेवकाला काँग्रेसकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. भाजपकडून नऊ, शिवसेनेकडून आठ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून चार माजी नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. ऐनवेळी निवडणुकीत उतरलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सात माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरले आहेत. दोन माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून, शिवसेना ठाकरे गटाकडून एका माजी नगरसेविकेने उमेदवारी दाखल केली आहे.
पक्षनिहाय माजी नगरसेवकांची संख्या – Kolhapur Municipal Corporation elections
| पक्ष | माजी नगरसेवकांची संख्या |
|---|---|
| काँग्रेस | २२ |
| भाजप | ९ |
| शिवसेना | ८ |
| राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) | ४ |
| जनसुराज्य शक्ती पक्ष | ७ |
| शिवसेना ठाकरे गट | १ |
| अपक्ष | २ |
काँग्रेसकडून सुभाष बुचडे (प्रभाग १) ते राजू आनंदराव दिंडोर्ले (प्रभाग २०) अशा विविध प्रभागांमध्ये अनुभवी नेते मैदानात उतरले आहेत. भाजपकडून दिलीप पोवार, संजय निकम, पल्लवी देसाई यांच्यासह एकूण नऊ माजी नगरसेवक लढत आहेत. शिवसेनेकडून अर्चना पागर, स्मिता माने, नंदकुमार मोरे यांच्यासह आठ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून माधवी गवंडी, महेश सावंत यांच्यासह चार उमेदवार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पूजाश्री साळोखे, शारदा देवणे यांच्यासह सात जण पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
एकूणच कोल्हापूर महापालिका निवडणूक यंदा केवळ पक्षीय प्रतिष्ठेची नसून, अनुभव विरुद्ध नवखे चेहरे आणि पक्षांतरानंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


