Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

राष्ट्रीय फुटबॉलपटू कोल्हापूर महापालिका निवडणूकीच्या मैदानात | Omkar Jadhav

कोल्हापूर | कोल्हापूरची ओळख केवळ ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक शहर म्हणून नाही, तर क्रीडापंढरी म्हणूनही आहे. कुस्तीप्रमाणेच फुटबॉलचीही या शहरात भक्कम परंपरा असून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव उज्वल केले आहे. याच परंपरेतून पुढे आलेला राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू ओंकार संभाजीराव जाधव (Omkar Jadhav) आता थेट महापालिकेच्या राजकीय मैदानात उतरला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने एका तरुण, क्रीडावंत आणि समाजाशी जोडलेल्या नेतृत्वाची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

ओंकार जाधव यांनी शालेय, राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मैदानावर शिस्त, संघभावना आणि संघर्षशील वृत्ती दाखवणारा हा खेळाडू आता समाजकारण आणि राजकारणातही तितक्याच आत्मविश्वासाने पाऊल टाकताना दिसत आहे. क्रीडाक्षेत्रातून आलेला तरुण राजकारणात सक्रिय होणे, ही कोल्हापूरच्या दृष्टीने लक्षवेधी बाब मानली जात आहे.

मंगळवार पेठेतील सामाजिक व राजकीय जीवनात जाधव कुटुंबाचे योगदान मोठे आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्राला सातत्याने पाठबळ दिले. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, क्रीडापटूंना संधी, तसेच विविध सामाजिक उपक्रमांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या पश्चातही जाधव कुटुंबाने हा वारसा जपण्याचे काम सुरू ठेवले आहे.

माजी नगरसेवक संभाजीराव जाधव हे मंगळवार पेठेतील सर्वसामान्यांसाठी हक्काचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. फुटबॉलच्या मैदानात चमकदार कामगिरी केल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या राजकारणात प्रवेश केला आणि सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत विश्वासार्हतेची हॅट्रिक साधली. २००५ ते २०२५ या कालावधीत त्यांनी तीन महापालिका सभागृहांमध्ये प्रतिनिधित्व केले. स्थायी समिती सभापती, गटनेतेपद आणि विरोधी पक्षनेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. नागरिकांच्या समस्या, शहर विकासाचे प्रश्न आणि विविध धोरणात्मक विषयांवर त्यांनी सभागृहात ठाम भूमिका घेतली.

शाहू मैदान, मंगेशकरनगर, कैलासगडची स्वारी मंदिर अशा वेगवेगळ्या प्रभागांतून मिळालेला सातत्यपूर्ण विजय हा जाधव कुटुंब आणि मतदारांमधील दृढ विश्वासाचे प्रतीक मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आता ओंकार जाधव नवी इनिंग सुरू करत असून, कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ओंकार जाधव हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक संभाजीराव जाधव आणि युवा उद्योजक सत्यजीत जाधव हे सर्व समाजकारणात सक्रिय असून, त्यांच्या कार्याचा प्रभाव प्रभागात स्पष्टपणे जाणवतो.

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून ओंकार जाधव हे प्रभागातील नागरिकांच्या थेट संपर्कात आहेत. दैनंदिन प्रश्न, नागरी सुविधा, तसेच युवकांशी संबंधित विषयांवर ते सक्रियपणे काम करत आहेत. फुटबॉलपटू म्हणून अंगी बाणलेली खिलाडूवृत्ती, शिस्त आणि टीमवर्कची भावना आता सार्वजनिक जीवनातही उपयोगी ठरत आहे. दुसऱ्यांच्या मदतीला तत्काळ धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेक नागरिकांना भावत आहे.

सध्या ओंकार जाधव यांचा प्रचार आणि जनसंपर्क वेग घेत असून, प्रभागातील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. क्रीडाक्षेत्रातून आलेला हा तरुण उमेदवार महापालिकेच्या राजकारणात कोणती छाप सोडतो, याकडे कोल्हापूर शहराचे लक्ष लागले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा